मंगळवार, ३० डिसेंबर, २०१४

तारूण्याच्या फ़ांदीवरती..

तारूण्याच्या फ़ांदीवरती बालपणाचा झोका गं
क्षणात खाली क्षणात वरती क्वचित वाटे धोका गं
नभात नक्षी आकांक्षांची, आणि पापण्या स्वप्नाळू
मध्येच ओठावरती हासू, क्षणात डोळे मुळूमुळू
भिंगोरीगत भिरभिरताना, नकळत चुकतो ठोका गं..
हृदय करावे नावावरती हळूच अनामिक कोण्या
सोडुन द्यावे मनास हलके स्वप्नी अधीन होण्या
काय मिळवले काय गमवले, नकोच लेखा-जोखा गं...
वहीत द्यावे ठेवून काही कुपी म्हणूनी स्मरणांची
ध्येय कोवळे चाल कोवळी जोडी लोभस हरणांची
जे जे येते जगून घ्यावे चुको न कुठला मोका गं..
-प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape