मंगळवार, ३० डिसेंबर, २०१४

दत्ता दिगंबरा....

ब्रह्मा विष्णू आणि महेश्वराच्या अवतारा
दर्शन दे रे त्रिगुणात्मका दत्ता दिगंबरा.... 

अनूसयेचा बालक तू अन जगताचा कैवारी
तीन मुखे अन सहा करांची, मूर्त दिसे साजरी
तेजस कांती, श्यामल डोळे, करुणेच्या सागरा
दर्शन दे रे त्रिगुणात्मका दत्ता दिगंबरा..

गाय -वासरु उभे समोरी, श्वान बैसले चरणी
कृष्णाकाठी वास तुझा अन प्रत्यय क्षणोक्षणी
नामस्मरणे पावन केले देहाच्या मंदीरा
दर्शन दे रे त्रिगुणात्मका दत्ता दिगंबरा..

वैरागी तू, योगीराज तू, विश्वाच्या नाथा
उत्पत्ती, अन स्थिती-लयाची गावी मी गाथा
भास तुझे बघ होती मजला जळी स्थळी अंबरा
दर्शन दे रे त्रिगुणात्मका दत्ता दिगंबरा...
-प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape