मंगळवार, १२ जून, २०१२

रत्नांच्या बघ राशी झाल्या,


रत्नांच्या बघ राशी झाल्या, 
माझ्या काचखड्यांच्या
काटे भरल्या वाटा होती , 
मखमल पायघड्यांच्या

ओले हिरवे झाले माझे, 
मौसम निष्पर्णाचे
निळे जांभळे फ़ूल श्रावणी, 
देही गोकर्णाचे

तुझ्यासोबती वाटा सार्‍या, 
यमनामधले गाणे
घमघमणार्‍या सुरावटींशी, 
नाते लोभसवाणे

रोमरोमी भिजते मीही, 
हळवा श्रावण दे
ओघळते मी प्राजक्तासम, 
भिजलं अंगण दे

उधाणू दे ना सागरलाटा, 
तुझ्या किनार्‍यावरी
तुझी पौर्णिमा होऊन आले, 
तुझ्याच मी अंबरी

-प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape