मंगळवार, १२ जून, २०१२

किती प्राक्तना करशील माझ्यावर तू कुरघोडी


मनासारखे झाले तरीही वाटे ना मज गोडी
किती प्राक्तना करशील माझ्यावर तू कुरघोडी

निर्झर होता झुळझुळणारा आता खळखळ नुसती
सळसळ होती तरुवेलींवर आता हळहळ नुसती
कुठे बिनसले काय बिनसले करते आकडेमोडी
मनासारखे झाले तरीही वाटे ना मज गोडी

चांदणवर्खी स्वप्नांनी ही ओंजळ भरली होती
मला न दिसली चंद्रामागे आवस दडली होती
म्हणू फ़सवणुक वा म्हणू मी दैवाची खोडी
मनासारखे झाले तरीही वाटे ना मज गोडी

उन्ह सावली खेळ म्हणे हा असतो संसारी
इंद्रधनुषी रंग म्हणे मग अवतरती दारी
फ़िकुटलेल्या रंगासोबत सोडवते कोडी
मनासारखे झाले तरीही वाटे ना मज गोडी

उगाच वाटे भरुन यावे गळ्यात काहीसे
कुण्या काळचे मनी साचले व्हावे नाहीसे
नकोस दैवा फ़ार करु आता झाडाझोडी
मनासारखे झाले तरीही वाटे ना मज गोडी

-प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape