रविवार, २७ मे, २०१२

......... आता कोसळ कोसळ!!


रान पेटले पेटले, वणवा हा अनावर
माती उरात रडते.. देह तिचा थरथर

नाही ठिपुस नावाला, डोळे कोरडे झरती
मूक गोठ्यात वासरे.. भूक-तहान चरती

कोरड्या नद्यात तडे, कुठे दिसेनाच पाणी
पायपीट दूरवर, पाण्यासाठी जीवघेणी

धाव धाव वेड्या आता, किती रूसशील तूही
तुझ्याविना जीवनाची, कशी झाली लाही लाही

डोंब आगीचा पोटात, विझवावा सांग कसा?
झाल्या बधीर जाणिवा, घेती तुझाच कानोसा..

कोसळ ना आता सख्या, तुला घालते साकडे
माझे आयुष्य तारण, आज ठेव तुझ्याकडे

देही भुईच्या रे वळ, बसे मरणाची झळ
ऐक तिची कळकळ, आता कोसळ कोसळ!!
......... आता कोसळ कोसळ!!

- प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape