मंगळवार, १७ एप्रिल, २०१२

तुझी आठवण येते...

उसळत्या लाटांमध्ये, उधाणत्या वार्‍यामध्ये
सांज घाली गहीवर... मन काहूर काहूर
पाझरत्या केशराचे, गाभूळल्या सुर्यास्ताचे
एक कारण मिळते.. तुझी आठवण येते

खोल रुतती जिव्हारी.. फ़ेनफ़ुले विरणारी
दिसे विवरच जसे.. ओल्या वाळूवर ठसे
कलणार्‍या सावल्यांना..पापणीत आसवांना
पुन्हा तारण ठेवते.. तुझी आठवण येते

पापण्यांची वस्त्रे सारी.. निग्रहाने दूर करी
मोती ओघळून गेला.. सांडे स्वपनांचा पेला
तुझ्या सारखी नाराज, हाय सागराची गाज
श्वास-कण सावडते .. तुझी आठवण येते

बिलगली रेती जशी, पावलांच्या तळव्याशी
आठवण तुझी तशी.. बोचरी हवीहवीशी
नसे अवधान काही.. माझे आभाळ प्रवाही
वेडे आंदण शोधते.. तुझी आठवण येते...

-प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape