सोमवार, ३० एप्रिल, २०१२

जिंकण्याची जिद्द आहे

तोकडेसे पंख माझे प्राण सुद्धा विद्ध आहे
अंतरी माझ्या नव्याने जिंकण्याची जिद्द आहे

जाच स्वप्नांना अता माझ्या नको येथे कुणाचा
लंघण्या क्षितिजास घेते कौल माझ्या मानसीचा
सूर्य घेतो जन्म जेथे तीच माझी हद्द आहे
अंतरी माझ्या नव्याने जिंकण्याची जिद्द आहे

पंख पसरुनी धरावी सावली या भूतलावर
पेलुनी घनभार शिंपावे मृदेवर धुंद अत्तर
हे अनाहत विश्व सारे.. मी तयाचा मध्य आहे
अंतरी माझ्या नव्याने जिंकण्याची जिद्द आहे

पिंजरा तोडून घ्यावी मी भरारी अंतराळी
आणि रेखाव्यात रेषा मीच माझ्या भव्य भाळी
ईश पाठीशी उभा, मी झुंजण्याला सिद्ध आहे
अंतरी माझ्या नव्याने जिंकण्याची जिद्द आहे

जिंकुनी घेईन सार्‍या या दिशांना एक हाती
मी अहंकारात वा गर्वात ना सोडेन माती
मार्ग खडतर खास तरिही ध्येय माझे शुद्ध आहे
अंतरी माझ्या नव्याने जिंकण्याची जिद्द आहे

-प्राजु

3 प्रतिसाद:

Vishal म्हणाले...

he jar aapan lihile asel tar kharech aapan ak jantya kawayatri aahat.

vibha म्हणाले...

shabdanche vajan aushyat anubhavalelya anubhavavapeksha jast ahe
-vibha

vibha म्हणाले...

shabdanche vajan aushyat anubhavalelya anubhavavapeksha jast ahe
-vibha

Page copy protected against web site content infringement by Copyscape