गुरुवार, २९ मार्च, २०१२

जाग जरा त्या विश्वासाला आणिक दे उत्तर!..

विश्वासाने पूजिले आणि म्हटले तुज 'ईश्वर'
जाग जरा त्या विश्वासाला आणिक दे उत्तर!

सुकलेल्यासह जळते ओले, नियम आहे जरी
सर्वस्वाची राखच व्हावी, इतका तू अविचारी??
नेसी आयुष्याला माझ्या कुठल्या वळणावर?
जाग जरा त्या विश्वासाला आणिक दे उत्तर!

काडीकाडी जोडून माझे घरटे सजलेले
गोड गोजिरे गाणे आमुचे सुखात भिजलेले
क्षणात एका घाव घालूनी नेले तू छप्पर
जाग जरा त्या विश्वासाला आणिक दे उत्तर!

डोळ्यांमध्ये फ़ुटल्या काचा खोल रुतती जरी
काचखड्यांची होतील रत्ने तुझिया चरणावरी
देव होऊनी सावर मजला, सोड तुझा फ़त्तर
जाग जरा त्या विश्वासाला आणिक दे उत्तर!

भरकटले हे तुझे लेकरु तुझ्याच आले दारी
लाभुदे रे तुझा सहारा दुनियेमध्ये विखारी
तुझ्या कृपेचे आयुष्याला लाभुदे अस्तर
जाग जरा त्या विश्वासला आणिक दे उत्तर!

-प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape