गुरुवार, २९ मार्च, २०१२

घे विसावा जरा

थांब ना पळभरी घे विसावा जरा
गुंजतो राउळी ऐक पावा जरा

जायचे दूर पण वाटही तोकडी
आठवांची सवे राहुदे पोतडी
काठ हा पापणीचा भिजावा जरा
थांब ना पळभरी घे विसावा जरा..

आजुबाजूस पाहून घे थांबुनी
राहिले जे दुवे घे पुन्हा सांधुनी
सूर हृदयातला रुणझुणावा जरा
थांब ना पळभरी घे विसावा जरा

जाणिवांना तुझ्या जाग यावी अता
जन्म होईल हा धावण्यातच रिता
आंधळा कैफ़ही ओसरावा जरा..
थांब ना पळभरी घे विसावा जरा

हासरी ही वसंती फ़ुले मख्मली
पावसाळी हवा धुंद गाभूळली
ऐक ना हा ऋतूंचा बुलावा जरा
थांब ना पळभरी घे विसावा जरा

-प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape