बुधवार, ७ मार्च, २०१२

रंग माझा वेगळा....

रूप जळाचे निळे सावळे, सरीसरींतून लडीवाळ
घराघरांवर गिरीशिखरांवर, नर्तन लाडीक वेल्हाळ

उभ्या अंगणी साचून पाणी, झळके कंकण पार्‍याचे
तरंग उठवी नाजूक साजूक, चाळे भलते वार्‍याचे

तुझी निळाई आकाशाशी, अथांग होऊन सजलेली
फ़ेनफ़ुलांच्या रांगोळीगत, रेतीवरती भिजलेली

दरी-खोर्‍यातुन थिरकत जाई, चाळ बांधुनी मोत्यांचे
ओले हिरवे अंग मोहरे, गवताच्याही पात्यांचे

फ़ुलून आले भिजताना मी, रोमरोमी उमटे ठसा
सांग एकदा कानी माझ्या, 'पाण्या तुझा रंग कसा?'

थोडी खळखळ करुन वदले, ''निळा-काळा, कधी जांभळा
रंगुनी रंगात सार्‍या.. रंग माझा वेगळा...."

-प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape