रविवार, ४ मार्च, २०१२

होईन माझ्या जीवनाची मीच शिलेदार

कोमट नाही ध्येय मनीचे, आहे अंगार
होईन माझ्या जीवनाची मीच शिलेदार

घेऊन वादळ हातावरती खेळेन भिंगोरी
घेईन नक्षत्रे गुंफ़ाया वीजेचीच दोरी
कडाडणार्‍या मेघांवरती होऊनिया स्वार
होईन माझ्या जीवनाची मीच शिलेदार

कुंपण अवघे खुजेपणाचे नकोच अवतीभवती
लगाम माझ्या आयुष्याचा आहे माझ्या हाती
विश्वासावर आत्मबलाच्या जाईन क्षितिजापार
होईन माझ्या जीवनाची मीच शिलेदार

दगडावरती लाथ घालुनी काढेन मी पाणी
कुंडलीतल्या ग्रहतार्‍यांची नको कथा पुराणी
स्वभाव म्हणा की म्हणा तयाला कुणी अहंकार
होईन माझ्या जीवनाची मीच शिलेदार

क्षणभर 'त्या'ला स्मरुन करावे प्रयत्न ध्येयासाठी
ठाव मला 'तो' उभा राहतो झटणार्‍याच्या पाठी
विवेक, संयम, सामर्थ्याचा अळवित ओंकार
होईन माझ्या जीवनाची मीच शिलेदार

-प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape