बुधवार, ७ मार्च, २०१२

.... दारी वसंत आला

थंडीत गोठलेल्या, सृष्टीत जीव आला
चैतन्य वाण घेउन, दारी वसंत आला

झाडांवरी नव्याने, आयुष्य जन्मलेले
अंकूर पालवीचे, बहराय लागलेले
हिरवाईचा दिलासा, निष्पर्ण जाणिवेला
चैतन्य वाण घेउन, दारी वसंत आला

माळावरी झुलाया, कित्येक रंग फ़ुलले
नाजूक पाकळ्यांच्या हृदयात गंध भरले
अन रंगपंचमीचा, उत्सव भरात आला
चैतन्य वाण घेउन, दारी वसंत आला

होळीमधे उदासी, पुरती जळून गेली
कनकापरी झळाळी, दाही दिशास आली
अन आम्र मोहरूनी, बघ स्वर्ण साज ल्याला
चैतन्य वाण घेउन, दारी वसंत आला

चैत्रावल्या मनाला, कोकीळ कंठ फ़ुटला
उन्मेषल्या उरातुन, हळुवार स्पंद उठला
आहेर पालवीचा माझ्या मनास गमला
चैतन्य वाण घेउन, दारी वसंत आला..

-प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape