बुधवार, २९ फेब्रुवारी, २०१२

वाहती हे मेघ अश्रूंच्या पखाली

गूढ अंधारात कसल्या हालचाली
पालखी मेल्या मनाची की निघाली?

एकटी पडले जशी दुनियेत या मी
वेदना माझ्या घरी वसतीस आली..

वेगळ्या वाटा कधी मी शोधल्या ना
जी मिळाली तीच काट्यांची निघाली

शोधण्या मी चांदण्याचा गाव जाता
पोचले का भंगल्या ऐने महाली?

वेदनेची एवढी झाली सवय की,
झेपते आता सुखाची ना हमाली!

घेउनी वैराग्य माझे सौख्य गेले
दु:ख आता नेहमी पुसते खुशाली

गर्द आभाळात घुसमट दाटली अन
वाहती हे मेघ अश्रूंच्या पखाली

-प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape