रविवार, २६ फेब्रुवारी, २०१२

इथे असेच चालते

कनेटीकटच्या वेदर बद्द्दल "If you are not happy with the weather, wait for some time " असं म्हणतात. कारण इथे बघता बघता वातावरण बदलतं. याबद्दल मी http://praaju.blogspot.com/2012/02/blog-post_02.html इथे लिहिलं आहे तेच शब्दांत बांधायचा प्रयत्न..


क्षणात मेघ दाटती, क्षणात ऊन तापते
निसर्ग येथला कसा!! इथे असेच चालते..

सकाळ कोवळी कधी, हळूच येत हासुनी
नभास माखते जणू, सुवर्ण रंग लेउनी
मध्येच अभ्र सावळे, पहा उन्हास झाकते
निसर्ग येथला कसा! इथे असेच चालते

लपेटता हिमात वृक्ष, शुभ्र गालिचा कधी
हिरे चकाकते जणू, उन्हांत सांडले कधी
तुफ़ान वादळी कधी सरीत बर्फ़ वाहते
निसर्ग येथला कसा! इथे असेच चालते..

उन्हांत तापते धरा तरी न ती चिराळते
दिशांत तप्त लाटही कधी कधी विहारते
तरी हराच रंग घेत पान पान हासते
निसर्ग येथला कसा! इथे असेच चालते...

इथेच फ़क्त पावसास भेटते मुभा बरी
ऋतू असो नसो तरी क्षणांत सांडती सरी
सुमार पावसातही फ़ुलून विश्व नाहते
निसर्ग येथला कसा! इथे असेच चालते..

- प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape