गुरुवार, २ फेब्रुवारी, २०१२

वेदर...वेदर!!"इफ़ यू डोन्ट लाईक द वेदर .. वेट फ़ॉर सम टाईम" असं म्हणतात कनेटिकटमध्ये. इतका प्रचंड लहरी निसर्ग आहे इथला. २००६ च्या मार्च -एप्रिल मध्ये जेव्हा अमेरिकेमध्ये पहिल्यांदा पाऊल टाकलं तेव्हा इथला स्प्रिंग चालू होता. हलकी गुलाबी थंडी होतीच मात्र बर्फ़ नव्हतं. गवतामधून पिवळी धमक डॅंडीलायन्स हळू हळू डोकावू लागलेली. झाडांच्या खराट्यांवरती नाजूक इवली इवली पालवी कळ्यांच्या रूपाने दिसू लागलेली.... नकळत भारतातल्या निसर्गाशी तुलना होत होती. मात्र धोधो पडलेला पाऊस पाहिला आणि मग वाटलं, असा केव्हाही कसा काय पाऊस पडू शकतो!! पण हो... इथे तेच होतं.

लेक प्रिस्कूल ला जायला लागल्यावर स्प्रिंग, समर, फ़ॉल आणि विंटर असे चार ऋतू आहेत इथले हे समजलं. म्हणजे.. यांच्याकडे पावसाळा नाहीच. मजा वाटली थोडी. जसजसे दिवस महिने लोटले तसतशी हळू हळू इथल्या निसर्गाशीही मी तितकीच समरस झाले. निसर्गाची कित्येक रूपं मी पाहिली.
फ़ॉल.. म्हणजे शिशिर.. पानगळ! पानगळ सुद्धा इतकी सुंदर मनमोहक असू शकते हे मला निसर्गाने दाखवून दिलं. 'नुसतं पावसावर काय प्रेम करतेस, आयुष्याची सांगताही इतकी रंगिबेरंगी आणि सुंदर असते.. बघ!! मोकळ्या मनाने येणार्‍या थंडिची काळजी न करता बघ एकदा!!" निसर्ग मला खुणावत होता आणि मीही त्याने दाखवलेल्या गोष्टी मोकळ्या मनाने बघत होते. हिरवी गार झालेली पर्णराजी हळू हळू पिवसळर, मातकट, तपकिरी होत होत लाल-बुंद,केशरी, पिवळी धमक असे वेगवेगळे असंख्य रंग अंगावर मिरवत होती. रोज सकळि उठून पहाव तर रंग वेगळा.. ! प्रत्येक पानाचा, प्रत्येक झाडाचा स्वत:चा रंग! एक पान दुसर्‍या सारखं नाही. तरीही त्या एका झाडावर एकत्रितपणे ती डुलत होती, हसत होती, रंगही बदलत होती. पाऊस पडला की फ़ॉल जातो सगळा गळून, असंही ऐकायला मिळालं. मात्र पाऊस पडल्यानंतर हा फ़ॉल बघताना मला आजीची आठवण व्हायची. ती म्हणायची, 'झालं गं आता वय... आता कशला नवी साडी, आणि दागिने.. आता कुठे नटायचंय मला!!" वाटायचं झाडंही पावसाला असंच म्हणत असतील का.. "झालं रे ..! पिकायला लागलो आम्ही आता.. ! कशाला उगाच शिडकावा करुन नटवायचा प्रयत्न करतो आहेस आम्हाला??" स्वत:चंच हसू यायचं. पण.. पावसाने दिलेले चकचकित हिरे, पाऊस ओसरल्यावर त्याची आठवण म्हणून प्रत्येक फ़ांदीवर माळलेले पाहिले की, त्या झळकणार्‍या लाल-केशरी रंगसंगतीमध्ये हिर्‍यांचं अस्तित्व मान्य करावंच लागायचं. आणि मनोमन त्या निसर्गापुढे मी नतमस्तक व्हायचे. पावसाची रूपंही किती असावीत!! हिरवागार शालू पांघरून बसलेल्या झाडांना गुदगुल्या करून हसवणारा पाऊस, तीच पाने पिकायला लागली की एखाद्या लहान मुलाप्रमाणे त्यांच्या अंगाखांद्यावर खेळणारा, पाने पूर्ण गळून गेली की, गोठवणार्‍या थंडीमध्ये "काळजी नका करू.. मी आहे ना!" असा दिलासा देत, त्यांच्या अंगावर साठलेलं बर्फ़ आपल्यासोबत वाहून नेणारा पाऊस! एकूण काय.. तर इथल्या निसर्गाचा पाऊस फ़ार लाडका आहे. त्याला कधीही कोणत्याही ऋतूत पडायची.. ते ही कोणत्याही रूपाने.. म्हणजे झिरमिर, रिपरिप, धो-धो.. अगदी कोणत्याही रूपाने पडायची पूर्ण मुभा आहे..!! तशी बर्फ़ाला नाही. आणि म्हणूनच ऑक्टोबर मध्ये झालेल्या स्नो फ़ॉल चा निषेध माणसांनी तर केलाच पण झाडांनीही केला.. अगदी धडाधड कोसळून!

इथला स्नो फ़ॉलही मनमुराद अनुभवला. भारतातला वळवाचा पहिला पाऊस अंगावर झेलताना, जसा रोमरोम फ़ुलून यायच्या तसाच इथला पहिला स्नो अंगावर घेताना झालं. वरून भुरभुर पडणार्‍या स्नोच्या पाकळ्या हातावर झेलून त्याचा आकार कसा बरोबर षट्कोनी किंवा अष्टकोनी आहे हे बघयाचं वेड जडलं. ८ -१० इन्च स्नो मध्ये जसा जमेल तसा स्नो मॅन करून त्याला गाजराचं नाक, स्ट्रोबेरीचे डोळे, आणि काड्यांचे हात लावून ४-५ दिवस पॅटीओच्या दारांत रखवालदार म्हणून उभा केला. स्नो बॉल्स करून एकमेकाला मारून लेकाशी खेळताना तितकीच रमले जितकी पावसाच्या सरींमध्ये चिखलात खेळताना रमायचे. स्नो, ब्लॅक आईस, कार्स स्किड होणे, या कानावर आदळणार्‍या गोष्टी प्रत्यक्ष अनुभवल्या सुद्धा! स्नो स्टॉर्मची वॉर्निंग, मग तयारी .. म्हणजे रस्त्यांवरुन खडे मीठ टाकणे वगैरे.. आणि त्यांतरची म्हणजे स्नो चालू असताना भराभर रस्ते स्वच्छ करणे, हे पाहिलं आणि 'गरज ही शोधाची जननी असते' याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. वादळामुळे ८ दिवस अंधारातही राहून झालं... वाटलं निसर्ग सांगतोय.. "नाचा किती नाचायचंय... पण एका फ़टक्यात तुमच्या आयुष्याची उलथापालथ करु शकतो मी" .. आणि पुन्हा एकदा त्याच्यापुढे मान तुकवली गेली.

विंटरमध्ये थंडीची लाट.. तर उन्हाळ्यात हीट वेव! सगळंच कसं एक्स्ट्रीम! असं म्हणतात की इथल्या वातावरणात ओझोन चा लेयर नाहीये.. त्यामुळे सुर्याचे अल्ट्रा व्हायलेट रेज हे एकदम त्वचेवरच येतात . नक्की काय आहे मला नाही माहिती.. पण एक खरं की भारतातला उन्हाळा बराचसा सुसह्य असतो...(हापूस आंब्यांमुळे होत असावा कदाचित.) मात्र रखरखणार्‍या वातावरणात सुद्धा स्वत:मधला ओलावा, हिरवेपणा टिकवून ठेवायला इथल्या निसर्गानं शिकवलं.

निसर्गाची इतकी रूपं मी पाहिली, अनुभवली, भोगली.. की त्याला मोजदादच नाही. रात्री १०.३० च्या सुमरास क्षितिजावरती धुरकटलेल्या ढगांच्या सोबतीने अर्धाच पण गाडग़्या इतका मोठा चंद्र बघितला आणि नेमकं मी काय बघतेय हेच समजेना. कारण रात्री १०.३० ला नेहमीच चहाच्या बशीएवढ्या चंद्राला वरती डोक्यावर आकाशात पाहिले होते. हिवाळ्यात ४.३० ला होणारी तिन्ही सांज... आणि ५.०० ला होणारा मिट्ट अंधार तसेच...... उन्हाळ्यात ८.३० ला होणारी तिन्ही सांज आणि ९.०० वाजता क्षितिजाला टेकणारा सूर्य.. शिवाय ४.३० होणारी पहाट आणि ५.३० ला लख्ख होऊन तळपणारा सूर्यही इथेच पाहिला. स्वत:च्या येण्याजाण्याच्या मनमानीपुढे माणसाला घड्याळे पुढे-मागे करायला लावणारा हा सूर्य आणि हा निसर्ग!! काय अहोत आपण या पुढे... मातीचा कण, अणूरेणू, क्षुद्र जीव?? काहीच नाही ....फ़क्त एक शून्य!!

आज जवळ जवळ ६ वर्षानी भारतात परतताना या निसर्गाने दिलेली शिकवण म्हणा, शिदोरी म्हणा घेऊन जात्येय, ती नेहमीच राहिल सोबत. जितका इथल्या माणसांनी जीव लावला तितकाच इथल्या निसर्गानेही जीव लावला. त्याने मारलं, झोडलं, अंधारात लोटलं.. जोजावलं, हसवलं... नाचवलं! शेवटी मीही त्याचंच एक लेकरु आहे ना?
- प्राजु

2 प्रतिसाद:

मुक्तछंद म्हणाले...

सुंदर! निसर्गाची सगळी रूपं डोळ्यासमोर उभी राहिली अगदी.

Xcogitation म्हणाले...

हो, मला सुद्धा इथे आल्यावर काय सर्वात जास्त भावलं असेल तर तो निसर्ग. मी state college म्हणून एक छोटेसे university town आहे तिथे ३ वर्षे Masters साठी होतो. प्रत्येक उन्हाळ्यात सायकलवरून पुर्ण ती निसर्गरम्य कौन्टी टायरी घातली ( चालत फिरलो असतो तर पायथी घातली असे म्हणालो असतो).ते दिवस आठवले कि अजुनही मस्त वाटते.
इथल्या निसर्गामुळे एक अजून झालं, मला आपल्या महाराष्ट्रातला सुद्धा निसर्ग अजून जास्त भावायला लागला. आधी, कधी मराठवाड्यात फिरताना, दगडी, धोंडे, वाळलेला गवत, ...ह्याचं अपृप वाटलं नाही. पण दोन वर्षापुर्वी जेंव्हा देवगिरीला हिवाळ्यात गेलो होतो, तर ते उबदार उन, कोरडी स्वछ हवा, महारष्ट्रातला थोडासा रुक्ष पण तरीही वेगळंच सौंदर्य असलेल्या निसर्गाची नव्याने ओळख पटल्यासारखे झाले. आणि मग वेरूळची शिल्पे बघितल्यावर तर खरंच कुठेतरी टाळी लागल्यासारखेच झाले. आपल्या पुर्वजांनी ह्या राकट देशातल्या दगडाळ निसर्गाशी किती जिव्हाळ्याचे नाते जपले होते असे वाटून गेले.
pennsylvaniaतल्या निसर्गाने मला सर्वात जास्त काय दिले असेल तर, माझ्या स्वताच्या गावच्या निसर्गाशी माझा जिव्हाळा वाढवला.
तुम्ही परत भारतात जाताहात.
Lucky you.
तुमच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा.
नीरज ( फिलाडेल्फिया)

Page copy protected against web site content infringement by Copyscape