गुरुवार, २ फेब्रुवारी, २०१२

..वाट पहाणे


हळवी हळवी होत मनाने
सांज अवेळी धुसरली
लंघून सार्‍या दिव्य चौकटी
क्षितिजापाशी गहिवरली

खोल उमटला ठसा मनावर
कोणाच्या गं अस्ताचा
अवखळणार्‍या लाटांखाली
रंग दडे अस्वस्थाचा

कोण छेडते व्याकुळ होउन
आर्त विव्हळ मारवा
झिरपत जातो खोल उरी अन
उदास करतो जिवा

अज्ञात दिशांचे हाकारे का
उगाच येती कानी
ऊर फ़ाडते आकाशाचा
गहिरी गूढ विराणी

दूर निघुनी जातो जोगी
ठेऊन काही मागे
मुसमुसणार्‍या रात्री सोबत
कोण अजूनी जागे

जपून ठेवी रात मनाशी
आठवणींची पाने
आता सुर्योदयापर्यंत
केवळ वाट पहाणे..

-प्राजु

1 प्रतिसाद:

रविंद्र "रवी" म्हणाले...

कोण छेडते व्याकुळ होउन
आर्त विव्हळ मारवा
झिरपत जातो खोल उरी अन
उदास करतो जिवा
वाह!किती दर्द आहे शब्दात!

Page copy protected against web site content infringement by Copyscape