बुधवार, १८ जानेवारी, २०१२

जराश्या वेगळ्या आता दिशा मी चाळते आहे

जराश्या वेगळ्या आता दिशा मी चाळते आहे
जिथे रमले कधी नाही तिथे रेंगाळते आहे

कधी नव्हता असा गोंधळ मनाचा पाहिलेला मी
कळेना कोणत्या प्रश्नात ते घोटाळते आहे

उगाचच पापण्या झुकती कधी ऐन्यात बघताना
तुझी गहिरी नजर मजला जणू न्याहाळते आहे

किती आशा नि आकांक्षा उरी आहेत माझ्याही
क्षितीजापार जाण्या मी दिशा कवटाळते आहे

जरी होते जखडलेली जुन्या रीती-रिवाजांनी
समाजाच्या अपेक्षांना अता फ़ेटाळते आहे

पहा आले कसे भटकून मन माझे सयींतूनी
नशील्या वारुणी जैसे जणू फ़ेसाळते आहे

जरासा काय शिडकावा असा केलास हृदयी तू
कशी मातीपरी मी अंतरी गंधाळते आहे!

- प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape