बुधवार, १८ जानेवारी, २०१२

घे भरारी...

कितीक चिंता पोखरती पण नकोस लावू जिव्हारी
झटकून काळोखाला घे तू आकाशात भरारी

दिशा हासर्‍या पसरून बाहू तुजला मिठीत घ्याया
वाट दावते प्रकाश रेखा क्षितीज पार कराया
नि:श्चयाचा कुंचलाही कष्टालाच चितारी
झटकून काळोखाला, घे तू आकाशात भरारी

हसले रूसले क्षणही सोबत घेऊन चाल जरासा
कधी निराशा मनी दाटता देतील तेच दिलासा
जरा भटकूनी आठवणींतुन मनांस दे तू उभारी
झटकून काळोखाला घे तू आकाशात भरारी

स्वत: स्वत:चा मार्ग जोखुनी चाल विश्वासाने
तुझ्या मागुती येतील सारे पहा जमावाने
तुझ्या पाठीशी सदैव आहे उभा कृष्ण-मुरारी
झटकून काळोखाला घे तू आकाशात भरारी

- प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape