सोमवार, २३ जानेवारी, २०१२

....तू असताना

सांज ढळूनी होते केशर.. तू असताना
दिशादिशांना सुवर्ण झालर.. तू असताना

मल्हाराचे चिंब उखाणे.. तू असताना
सरीसरीतून पाऊसगाणे.. तू असताना

उरात माझ्या उधाण सागर.. तू असताना
क्षितिजाला सुर्याचे झुंबर... तू असताना

वारा घाली नभात पिंगा .. तू असताना
छेडीत जातो स्वर सारंगा.. तू असताना

कोमल नवथर हिरवी पाती... तू असताना
सलज्ज ओली गंधीत माती... तू असताना

झिम्मड होतो अल्लड पाऊस.. तू असताना
बिलगुन म्हणतो नकोच जाऊस.. तू असताना

गालावरती हळूच लाली... तू असताना
उरांत गीते नवी नव्हाळी...तू असताना

शब्दांवरती जडते माया.. तू असताना
घमघमतो कवितांचा फ़ाया.. तू असताना

- प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape