गुरुवार, २९ डिसेंबर, २०११

बाबाची अंगाई..

पापण्यांवर नीज येऊन जडावले डोळे
घे बाबाच्या कुशीत सोन्या निवांत हिंदोळे

धावधावतो बाबा जणू की पायाला भिंगरी
शिणतो, धडपड करतो येण्या लवकर माघारी
व्याकुळते मन बाल्य स्मरुनी होते बघना खुळे
घे बाबाच्या कुशीत सोन्या निवांत हिंदोळे

बाबालाही आस सतावे तुझ्याच बोलांची
चिऊ-काऊची गोष्ट बोबडी लाख मोलांची
समजुत काढू कशी तुझी मी मलाच हे ना कळे
घे बाबाच्या कुशीत सोन्या निवांत हिंदोळे

घरट्यामध्ये पक्षी निजले रात खूप झाली
चांदोमामा झोपी गेला त्याच्या मेघ महाली
नीज माझ्या राजा आता थांबव ना चाळे
घे बाबाच्या कुशीत सोन्या निवांत हिंदोळे

आई भवती तुझे छोटुले विश्व गुंफ़लेले
कर्तव्याने बाबाचे बघ हात बांधलेले
इवले इवले स्मरशील ना रे अपुले क्षण आगळे
घे बाबाच्या कुशीत सोन्या निवांत हिंदोळे

-प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape