गुरुवार, २९ डिसेंबर, २०११

... अन जगण्यावर जीव जडावा

तुझ्या मिठीतच रात सरावी, तुझ्या मिठीतच दिन उजळावा
प्रीत खुलावी ओठावरती अन जगण्यावर जीव जडावा

हळूच फ़ुंकर श्वासामध्ये माझ्या घालुन छेडीत पावा
सूर घुमावा कायेमधुनी अन जगण्यावर जीव जडावा

माळून घेता ओलेत्याने पाचू मरवा बहरून यावा,
गंध वहावा केसांमधुनी अन जगण्यावर जीव जडावा

सरसर शिरवे असे झरावे, अवघा देहच मखमल व्हावा
लाजाळूगत जावे मिटुनी, अन जगण्यावर जीव जडावा

उधाणलेला सागर गहिरा, माझ्या नयनी भरुन यावा
तुझ्या किनारी लाट भिडावी, अन जगण्यावर जीव जडावा

लाघव कविता उमलुन यावी, शब्द उरातून घुमून यावा
मीच कविता होऊन जावे, अन जगण्यावर जीव जडावा

-प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape