गुरुवार, २९ डिसेंबर, २०११

आता वसंत घाली, माझ्या मना भुरळ..

शिशिरात सोसली मी, बेबंद पानगळ
आता वसंत घाली, माझ्या मना भुरळ

घासून काढलेले, माझ्या मनास मी
आभाळ शिंपुनी तू, त्याला जरा विसळ

नजरेत या जराशी, घालूनिया नजर
डोळ्यात माझिया तू, स्वप्ने तुझी मिसळ

सोडून सर्व चिंता, कर्तव्यही जरासे
फ़ुटकळ असे तसेही, बोलू अघळपघळ

मी गाज सागराची, गंभीर शांत पण
होऊन लाट तूही, हृदयात या उसळ..

घेऊ नकोस आढे-वेढे उगाच तू
आहे मनांत जेही, बोलून जा सरळ

स्पर्शू नको दुरूनी, नजरेतुनी मला
ओल्या मिठीत माझ्या, ये ना जरा वितळ

रचशील प्रेमकाव्य, 'प्राजू' कधी पुन्हा
शब्दांत साठलेले, ऐश्वर्य तू उधळ

- प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape