गुरुवार, २९ डिसेंबर, २०११

सुखात होऊदे रे आता जन्माची सांगता..

जगण्यापुरते दिलेस सारे काही ना मागता
सुखात होऊदे रे आता जन्माची सांगता
हे जगधाता... विश्वविधाता...!

आयुष्याच्या संध्यासमयी भीव वाटे जरी
दे दिलासा हात तुझा रे ठेऊन माझ्या शिरी
सरून जावे उरले जीवन नाम तुझे घेता
सुखात होऊ दे रे आता जन्माची सांगता..

रडलो हसलो पडलो झडलो ठाव तुला सारे
जगण्याची ती धडपड होती, काही चुकले का रे?
तुझ्याच चरणी मिळेल माझ्या मनास या शांतता
सुखात होऊ दे रे आता जन्माची सांगता..

हिशोब सारे चुकते होवो निघून जाण्यापूर्वी
सेवा घडूदे मानव्याची माझ्या हातांकरवी
मोह सरावा भौतिकतेचा सरणावरती जाता
सुखात होऊ दे रे आता जन्माची सांगता..

- प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape