गुरुवार, २९ डिसेंबर, २०११

थोडी पिऊन घेतो..

झरताच वेदना ही, डोळ्यात गोठलेली
थोडी पिऊन घेतो, ग्लासात ओतलेली

मदिरालयात जो तो, हसतो असा तसाही
डोकावते व्यथाही, हसण्यात झाकलेली!

बेहोश होउनी मी, पडलो कधी न कोठे
म्हणतात बेवडा पण, रस्त्यात भेटलेली!

का गंध आठवेना, आता मला तुझाही
बस्स, वारूणीच वसते, श्वासात, घेतलेली!!

होताच दाट छाया, घेते कुशीत मजला
देते जरा उबारा, नुकत्यात 'घेतलेली'

मदिरालयात कोणी, ना राव-रंक असतो
असते व्यथाच तेथे, हृदयात पेटलेली

असतो अधुन मधुन मी, शुद्धीतही जरासा
स्मरते पुन्हा कहाणी, अर्ध्यात फ़ाटलेली..

होताच रात गहिरी, जातात सर्व निघुनी
मी वळकटीच माझी, गुत्त्यात थाटलेली

-प्राजू

Page copy protected against web site content infringement by Copyscape