गुरुवार, २९ डिसेंबर, २०११

'मौनास' बोलण्याला शिकवायचे जरासे..

'मौनास' बोलण्याला शिकवायचे जरासे
रूचते न जे मनाला, ठुकरायचे जरासे

आता अलिप्त राहुन, चालायचे न काही
घडता जरा चुकीचे, अडवायचे जरासे

दाबून सर्व इच्छा, मनही मरून गेले
त्याचेही लाड आता, पुरवायचे जरासे

पाहून वाट येथे काहीच ना मिळाले
मिळवायला जरासे.. झगडायचे जरासे

नाहीच आस मजला, लहरी तुझ्या ऋतूंची
आता स्वत: स्वत:चे , बहरायचे जरासे

झाले म्हणून सुंदर, कित्येक चेहर्‍यांना
आता स्वत:स लाजुन, निरखायचे जरासे

जन्मावरीच सार्‍या, उठले चरे हजारो
अलवार ते पुसूनी मिटवायचे जरासे

केलीस खूप चिंता! 'प्राजू' इथून पुढचे..
आयुष्य राहिलेले, खुलवायचे जरासे

- प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape