सोमवार, ७ नोव्हेंबर, २०११

मनाचा मीच का रस्ता कधी रुंदावला होता?

कधीचा प्रश्न ज्याने जीव हा भंडावला होता
तुझ्या पत्रातला मजकूर का ओलावला होता??

पुन्हा तेव्हा असा पिंगा सयी घालून गेल्या की
पहा काव्यात माझा शब्दही भांबावला होता

शहाण्यासारखे वागू कसे मी एकटी, सांगा
इथे जो भेटला, तोही पुरा नादावला होता

'मनाचे ऐकुनीया मी, कशी गोत्यामधे येते..!!'
असे सांगून मेंदू कैकदा रागावला होता

अजूनी सांगती साऱ्या तुझ्या खाणाखुणा तिथल्या
तुझ्या संगे तिथे एकांतही धुंदावला होता

मनामधल्या जुन्या वाटा, खुणा सार्‍या कुठे गेल्या?
मनाचा मीच का रस्ता कधी रुंदावला होता?

कधी नव्हताच राजी तो परतण्याला जगी इथल्या
तुझ्या स्मरणात रमण्या जीवही सोकावला होता

उगा 'प्राजू' नको लावूस आता बोल अश्रूंना
जिवाचा पाळणा त्यांनीच ना जोजावला होता?

- प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape