सोमवार, ७ नोव्हेंबर, २०११

माझी गझल..

रोज काही गूज गोष्टी सांगते माझी गझल
आणि माझ्या अंतरीचे जाणते माझी गझल

काय मी लपवू तिच्या पासून, मजला ना कळे!
ना कधीही बोलले जे, ऐकते माझी गझल

वागते मी नेहमी ,ती सांगते मजला जसे
पण तरी माझ्यावरी रागावते माझी गझल!

ती अशी बेधुंद होते, झिंगते मदिरेपरी
अन नशा चढता खरेही बोलते माझी गझल..

ती कधी होते सखी, आई कधी, तर शिक्षिका
खेळते, जोजावते, सांभाळते माझी गझल..!

लाजते, नटते कधी, तर भांडते रडते सुद्धा
वार माझ्या लेखणीचे सोसते माझी गझल

काढता मी खरवडूनी वाळल्या जखमा कधी
आसवांसह भळभळूनी वाहते माझी गझल

खेळता मी काफ़ियांशी संशयाने पाहते
बांधता शब्दांत तिजला हासते माझी गझल

मी सुखी व्हावे म्हणे.. मज सांगते वेड्यापरी
हातही देवापुढे मग जोडते माझी गझल

- प्राजु

2 प्रतिसाद:

Shailaja Gokhale (Bhope) म्हणाले...

Sundar!

Shailaja Gokhale (Bhope) म्हणाले...

Khup ch chhan. Sundar kavita! Lahan panichya Diwali chya aathavani jagya zalya. Ithe Ameriket kuthun sada rangoli karnar. India chi aani tithalya Diwali chi aathavan aali he vachun.

Page copy protected against web site content infringement by Copyscape