सोमवार, ७ नोव्हेंबर, २०११

जाहली अंधार दिवाळी..

ऐन दिवाळीत इथे झालेल्या घनघोर हिमवादळामुळे, आम्ही ५ दिवस अंधारात होतो. प्रचंड फ्रिझिंग टेंपरेचर मध्ये घरातले हीटर बंद, आणि लाईट नाहीत..! नळाला येणारं पाणीही बर्फाचं गार! खूप विचित्र झालं होतं सगळं. कनेटीकट मध्ये अजूनही काही भागात वीज नाहीये. आमच्या भागात आली वीज. ५ दिवस आम्ही सगळ्या जगापासून दूर होतो. फोन, इंटरनेट सगळंच बंद होतं.. तेव्हा .. अंधार घेऊन आलेल्या या दिवाळीला गझलेत बांधायचा हा प्रयत्न..

करुनिया लाचार दिवाळी
जीवनावर स्वार दिवाळी

आयुष्याला गोठवूनी
आसवांची धार दिवाळी

प्रकाश देणारी कशी ही
जाहली अंधार दिवाळी

का अवेळी गोठवणारा
वादळी ललकार दिवाळी

वीज गेली थमले जीवन
होत हाहा:कार दिवाळी

दिपोत्सवी नकोत अश्रू
कर अता उपकार दिवाळी

- प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape