बुधवार, १९ ऑक्टोबर, २०११

जायचे आहे तुला तर एकदा भेटून जा..

जायचे आहे तुला तर एकदा भेटून जा
प्रश्न-गाठी गुंतलेल्या त्या जरा उकलून जा

भूतकाळाचा मनाला त्रास होतो केवढा
शक्य झाले तर जरासे त्यास तू बदलून जा

लागले शून्यात डोळे, पापण्या झरती तरी
शिणुन गेल्या पापण्यांना नीज तू देऊन जा

'बावरी' म्हणतात सारे हासुनी माझ्यावरी
मी हसू वा रागवू ? तू एवढे सांगून जा

वेगळी आहे जरा माझ्या सुखाची कल्पना..
तू सुखी आहेस तेथे, फ़क्त हे पटवून जा!

शोधुनी काढेन मी वाटा तुझ्या त्या गावच्या
उमटल्या पाउलखुणा सार्‍या तशा ठेऊन जा

ठेवले मांडून मी सुखदु:ख सारे जीवनी
एकदा येऊन तू हीशोब पडताळून जा

ईश्वरा! मीही सुखी होईन केवळ एक कर
माझिया भाळी सुखाची रेख तू रेखून जा

काय हे भलतेच 'प्राजू' मागसी देवाकडे!
तू सुखाची कल्पना करणे अता विसरून जा!!

- प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape