वाट प्रकाशात न्हाली..
चालायचे दूर पण, वाट कशी अंधारली
चांद लपला गं आणि आवसच झेपावली
चूरचूर वाजतो गं, पाचोळा हा पायाखाली
भिवविते सळसळ, गर्द पानात दाटली
गारवाही जहरी गं, कसे अंग अंग जाळी
नटलेली काळोखात, रात भरात गं आली
भिती दाटलेली उरी, तरी मोहाच्या गं भूली
अंधारत कुणी कशी, पावले गं खेचलेली
भिरभिर लहरते, एक चुकार पाकोळी
नाचवते काळोखाला, कशी होऊन गोंधळी
एक लहर भितीची, आरपार शहारली
दर्या डोंगरात खोल, रानातूनी थरारली
हलकेच क्षितिजाशी, केशरी चाहूल आली
पसारा गं आवरूनी, आवसही परतली
येता रथातून रवी, सृष्टी सारी लख्ख झाली
पहाट मंगल होता, वाट प्रकाशात न्हाली
- प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा