बुधवार, १९ ऑक्टोबर, २०११

छेडती मल्हार, धारा, सोबतीने गात माझ्या..

छेडती मल्हार, धारा, सोबतीने गात माझ्या
नाचले आभाळ वरती पाहुनी डोळ्यात माझ्या

एक वेडा, एक सुंदर, एक हसरा, एक रुसला
केवढे क्षण निरनिराळे गुंफ़ले गोफ़ात माझ्या!

साद घालूनी अशा बोलावती दाही दिशा की..
ओढ वेडी लागली अन धावले नादांत माझ्या

हात पसरूनी मिठी मी पावसाला घातली अन
बिलगुनी मज राहिला तो, सोबतीने न्हात माझ्या

तोकडा वाटे मला कॅन्व्हास हा तुज रेखण्याला
रंगवावे आज तुजला, भव्य आकाशात माझ्या

जांभळे पक्षी, निळे पाणी, खुळी राने, फ़ुलेही
सांगती सार्‍या तुझ्या खाणाखुणा गावांत माझ्या

आवडे आता तुला रेंगाळणे शब्दांसभोती
रंगशी इतका कसा तू बावळ्या रंगात माझ्या!!

नाचते नादावरी सर होउनीया चिंब ओली
गुंफ़ते माझी मला मी चिंबशा काव्यात माझ्या

- प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape