बुधवार, १९ ऑक्टोबर, २०११

पोकळी उरते तुझे मी नाव देखिल गाळता..

'जा कुठेही मी उभा आहेच तुझिया स्वागता!!"
दु:ख म्हणते रोज मजला, त्यास बाजू सारता!

जिंकते आला दिवस भांडून नियतीशी जरी
झोपताना ना कधी मिळते मनाला शांतता

हासते मी, बोलते मी, दिवस सारा काढते
संपते अवसान उसने सांज दारी सांडता

चांदण्यानी गगन भरले, का रिते भासे तरी
वाटते कसली कमी जर चंद्र आहे नांदता??

'दे सहनशक्ती मला!' देवास मी म्हटले पुन्हा
मागुनी आलेच नाही सौख्य मजला मागता

वेढले आयुष्य सारे खूप गोष्टींनी तरी
पोकळी उरते तुझे मी नाव देखिल गाळता

परसते मी पंख, घेण्याला भरारी या इथे
दाटूनी नभ सावळे बघ रोज घाली मोडता

- प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape