बुधवार, २८ सप्टेंबर, २०११

झोपेलाही दूर धाडुनी स्वप्नांना मी करते आर्जव.

वठून गेले जीवन माझे, आता नाही होणे पालव
कशास त्याची वाट पहावी जे घडणे आहेच असंभव!!

'या ना येथे! घेउन मजला, सैर नभाची घडवुन आणा'
झोपेलाही दूर धाडुनी स्वप्नांना मी करते आर्जव.

भाळावरती लेखुन गेली सटवाई जन्माच्यावेळी!!
नसेल तुजला मान्य, तुझे तू, नशीब आता बदलुन दाखव!!

माझ्या सर्वस्वाला अर्पुन, जपले मी रे तुझे 'तुझेपण'
काय तुला पण सलते खुपते, विचार करती मनात तांडव

"तुझ्या उशाला स्वप्ने माझी, तुझ्या अंतरी विचार माझे"
जगण्याला मज पुरे तेवढे! खोटे असुदे.. किमान भासव!!

कधी गोड अन केव्हा कडवट, क्षण आले अन गेले तरिही
चव ना आली आयुष्याला, किती पाहिले घालुन सैंधव

गालावरती लाली होती, लोचनातही होती धुंदी
कडाडकड ढासळली स्वप्ने, समोर जेव्हा आले वास्तव

सदैव केली तुझी उपेक्षा, अबला म्हणुनी तुला हिणविले
'गूळ कसा?' हे कसे कळावे, समाज अपुला आहे गाढव

- प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape