बुधवार, २८ सप्टेंबर, २०११

'माग!" म्हणाला 'तो' तेव्हा पण..

'माग!" म्हणाला 'तो' तेव्हा पण, काही सुचले नाही
जरी निसटले हातातुनी क्षण, तरी मी खचले नाही

ओल येऊनी मनास आता सुटले पापुद्रे
उसळून लाव्हा खोल पुन्हा, बसती वर हदरे
घाव मिरवले जैसे गोंदण, पण मी रडले नाही
जरी निसटले हातातुनी क्षण, तरी मी खचले नाही

मृगजळ सारे रेतीवरचे, दुनिया सारी विखारी
हात पसरुनी मागायाला, मीही नाही भिकारी
मजबूरी वा अहंकार म्हण!! मजला पटले नाही
जरी निसटले हातातुनी क्षण, तरी मी खचले नाही

राखेमधुनी उठले पुन्हा, पेलावया आभाळ
हातावरती प्राण ठेवोनी, तुडविन रानोमाळ
पडले झडले तरिही 'हरले!" कधीच म्हटले नाही
जरी निसटले हातातुनी क्षण, तरी मी खचले नाही

-प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape