बुधवार, २८ सप्टेंबर, २०११

बाबा माझा माझ्यासाठी..

मनात ओल्या रेतीवरती गतकालाचे ठसे उमटले
बाल्य स्मरूनी इवले इवले ओठावरती हसे उमटले

धडपड सारी माझ्यासाठी, माझ्या एका हास्यासाठी
मिळेल तो क्षण, लटके भांडण, कधी लाघवी वाटाघाटी
थकून खांद्यावरती तुझिया, निवांत तेव्हा निजून गेले
माझ्या गालावरती तुझिया सदर्‍याचेही ठसे उमटले..!!
बाल्य स्मरूनी इवले इवले ओठावरती हसे उमटले

बाबा माझा माझ्यासाठी, भिडला सार्‍या दुनियेला
जपून मजल फ़ुलापरी तो आकाशागत उभा राहिला
बोट धरूनी जाता जाता, पंखांना मज बळ दिधले
आयुष्यावर माझ्या , बाबा!, तुझे घेतले वसे उमटले!!
बाल्य स्मरूनी इवले इवले ओठावरती हसे उमटले
- प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape