बुधवार, २८ सप्टेंबर, २०११

सांगती खुणा, तेव्हा जाहले गदर होते

सांगती खुणा, तेव्हा जाहले गदर होते
या इथे कधी काळी देखणे शहर होते

बांधती समाधी ते, वीर आणि जेत्यांची
फ़ूल वाहिल्या नंतर, फ़क्त ती कबर होते

चंद्र चांदणे येती, आणि परतुनी जाती
आठवण तुझी येते आणि बस! कहर होते!!

कोणती जखम होती, सतत टोचणारीशी??
लिंपण्या तिला तू रे, रिचवले जहर होते

पेटल्या वसंताच्या, भावना इथे तेथे
पोळल्या कळ्या आणिक, करपले बहर होते

मी मनास पाठवतो, आठवांतुनी फ़िरण्या
एरवी सहल असते, पण कधी सफ़र होते!!

घाव गंधले माझे, काय अन कसे सांगू?
वार जे करुन गेले, ते तुझे अधर होते

-प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape