शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०११

अबोल झाले शब्द जरासे..

अबोल झाले शब्द जरासे,
उगाच हळवे देत उसासे
कागदावरी उमटत नाही
मनास द्यावे कसे दिलासे?

मनाचेही या स्वभाव भिन्न
वरती हसरा आतून खिन्न
अलगद हलले वरती काही
आतून होते क्षणांत सुन्न

रंग ओतले कितिक सारे
तरी न फ़ुलले शब्द पिसारे
नीर दाटले आत खोलवर
आज तरी ते बरसेल का रे?

ओल्या मनाचे ओले अंगण
शब्दांची ना होते गुंफ़ण
श्वास अडकता होऊन हळवा
झरण्या आतूर होतो कणकण

तूच सहारा तूच निवारा
तुझ्या सयींचा मनी पसारा
लाट होऊनी आलो होतो
दिसला ना मज तुझा किनारा

- प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape