शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०११

अंतरात या शक्ती लाभो, ईश्वर-दयाघना

अंतरात या शक्ती लाभो, ईश्वर-दयाघना
शब्द सूरातुन अशीच होवो सृजनाची साधना ||धृ||

मुके बावरे शब्द आमुचे, घेशील का समजुनी
?कंठामध्ये प्राण ओतले, दोन्ही कर जोडुनी
सुरांसुरांतून तुझी प्रतिमा, काय करू कल्पना!!
अंतरात या शक्ती लाभो, ईश्वर-दयाघना ||१||

हात फ़िरूदे पंखावरूनी, पेलावया अंबरा
मुखी राहुदे नाम तुझे सत्यं शिवं सुंदरा
भार न वाटो जगा आमुचा, हीच मनी कामना
अंतरात या शक्ती लाभो, ईश्वर-दयाघना ||२||

स्पंदनातुन वाजे वीणा, तूच नाद ब्रह्म
कणाकणातुन ध्यास घेतला तुझाच आजन्म
तुझ्या कृपेने जागृत व्हाव्या सार्‍या संवेदना
अंतरात या शक्ती लाभो, ईश्वर-दयाघना |||३||

- प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape