पहाटवारा सांगत होता, तुझ्या बटांना जरा उडू दे
पहाटवारा सांगत होता, तुझ्या बटांना जरा उडू दे
मुक्त रेशमी कुंतलात गं, जीव गुंतू दे, धुंद होऊ दे
मुडपुनी अलगद ओठपाकळ्या, गालामध्ये उगा हाससी
खोल गहिर्या नयनामधुनी, मनातले का गूज सांगसी?
तहानलेल्या जीवास माझ्या, तुझ्या ओठीची नशा चढू दे
पहाटवारा सांगत होता, तुझ्या बटांना जरा उडू दे
वसंत येतो देहावरती, फ़ुलाफ़ुलांची रेशिम काया
जरा घेऊ दे चुंबून मजला, बहर उगा तो जाईल वाया
तुझ्या मख्मली देह पाकळ्या, माझ्या देही जरा माळूदे
पहाटवारा सांगत होता, तुझ्या बटांना जरा उडू दे
रंग विरतील अस्तित्वाचे, प्रणायाच्या बरसातीमध्ये
गंधित होऊन आवेगाने, श्वास मिसळतील श्वासामध्ये
प्रीत नेऊदे पूर्णत्वाला, तुझ्या अंतरी मला वसू दे
पहाटवारा सांगत होता, तुझ्या बटांना जरा उडू दे
- प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा