रविवार, १४ ऑगस्ट, २०११

ऐक माझ्या स्पंदनांचा न्यास नुसता..

चांदणे आहे खरे की भास नुसता
आणि छळतो का असा मधुमास नुसता

वैद्यकी तू थांबवूनी ये जरा अन
ऐक माझ्या स्पंदनांचा न्यास नुसता

कोण राधा, कोण मीरा, का अशा त्या?
श्रीहरीचा काय त्यांना ध्यास नुसता!!

आजही तो वेड लावी रोज मजला
त्या तुझ्या गं मोगर्‍याचा वास नुसता

पावसाच्या बहरल्या सार्‍या कळा अन
पाहिजे मजला तुझा सहवास नुसता

गाल एकांतातही झाले गुलाबी
भोवती आहे तुझा आभास नुसता

पितृ-वचनी, राम पुरुषोत्तम ठरावा
जानकीला जन्मभर वनवास नुसता

वादळे उठती कधी दाटून येते
या मनाचा बांधते अदमास नुसता

- प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape