आहे क्षणीक वणवा, येईल गारवाही
आयुष्य थोडके ना, बाकी बरेच काही
आहे क्षणीक वणवा, येईल गारवाही
नैराश्य ग्रासले अन आली जरा उदासी?
झटकून टाक सारे, लावू नको मनाशी
'होईल काय?' चिंता करण्यात अर्थ नाही
आहे क्षणीक वणवा, येईल गारवाही
स्वप्ने तुझी अजूनी, होतील पूर्ण सारी
आहेत खाच खळगे, लागेल ठेच भारी
संघर्ष कर पुन्हा तू, भीती नको जराही
आहे क्षणीक वणवा, येईल गारवाही
ही रात काळोखाची, आहे जरी विखारी
फ़ुत्कार टाकणारे, ते सर्प ही विषारी
जाऊ नको खचूनी, थांबू नको जराही
आहे क्षणीक वणवा, येईल गारवाही
का साथ रे कुणाची, तुजला हवीच आहे?
पाठी सदैव तुझिया, ईश्वर उभाच आहे
आव्हान पेलताना, बिचकू नको जराही
आहे क्षणिक वणावा, येईल गारवाही
अंधार दाटलेला, दे पेटवून सारा
विश्वास ठेव, लाभेल ध्येयास रे किनारा
हिम्मत तुझ्यात आहे, ठाऊक हे तुलाही!
आहे क्षणिक वणवा, येईल गारवाही
- प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा