उगाच ओलावल्या पापण्या..
उगाच ओलावल्या पापण्या, उरांत काही हलून गेले
किती रोखले मनास तरीही, सयीत तुझिया भिजून गेले
सभोवताली येती जाती, असती नुसती नातीगोती
कुणा दिसेना, ओल जराशी आली माझ्या पापणकाठी
किती झुरावे, का झुरावे , प्रश्न मजला छळून गेले
किती रोखले मनास तरीही, सयीत तुझिया भिजून गेले
फाटून गेले नभ हे माझे, वीज मनावर कोसळली
खचून गेली, तडकून गेली, वेस मनाची ढासळली
ढिगार्यात त्या स्वप्न आपुले, सख्या, कसे रे चिणून गेले !
किती रोखले मनास तरीही , सयीत तुझिया भिजून गेले
वारा येतो, परतून जातो, केसातूनी ना दरवळतो
खोटे हसतो, अन मुसमुसतो, आरसा मजला हिणवितो
तुझ्याविना ना गीत उमटे, सूर ओठी थिजून गेले
किती रोखले मनास तरीही, सयीत तुझिया भिजून गेले
येशील का तू, तार मनाची हळू छेडण्या पुन्हा एकदा?
घेशील का मज, कवेत तुझिया, झुलविण्याला पुन्हा एकदा ?
पुन्हा एकदा फुलेल का रे जीवन कोमेजून गेले ?
किती रोखले मनास तरीही, सयीत तुझिया भिजून गेले
- प्राजू
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा