रविवार, १० जुलै, २०११

ना मी खाल्ले लोणी माते, ना मी खाल्ले लोणी

तुझिया पाशी सांग माझी चुघली केली कोणी
ना मी खाल्ले लोणी माते, ना मी खाल्ले लोणी

जाता येता करतो खोड्या, चोळी लपवितो
खडा मारुनी माठ फोडतो , अंग भिजवितो
कितीक कागाळ्या माझ्या या करती गवळणी
ना मी खाल्ले लोणी माते, ना मी खाल्ले लोणी

यमुने काठी सवंगड्यासवे खेळ खेळताना
हळूच येऊन कवेत घेऊन, म्हणती 'माझा कान्हा'
चीडविती सारे, होते माझी चर्या केविलवाणी
ना मी खाल्ले लोणी माते, ना मी खाल्ले लोणी

जिला समजते मनातले मम, विचार तू तिजला
तिच्या परी ना कोणी घेते समजुनिया मजला
'केवळ ना मी केली चोरी' सांगेल राधाराणी
ना मी खाल्ले लोणी माते, ना मी खाल्ले लोणी

- प्राजू

Page copy protected against web site content infringement by Copyscape