बरसले शब्द जणू..
घनवेडी आस कशी, लावतेय हूरहूर हूरहूर
बरसले शब्द जणू, चिंब भिजला गं सूर
गावे पावसाचे गाणे, अंतराळी मन नाचे
थेंब अमृताचा जणू, लाल ओठावर सजे
आज माझ्या मुखड्याचा, पहा बदलला नूर
बरसले शब्द जणू, चिंब भिजला गं सूर..
आस तुझ्या कोसळाची, नयनात भिजलेली
भेगाळल्या काळजात, प्रीत वेडी थिजलेली
असे दाटलेय काही, आज उरात काहूर
बरसले शब्द जणू, चिंब भिजला गं सूर
ओलावली काया सारी, ओलावले माझे भान
पदरात आज माझ्या, ओल्या सरींचेच दान
तुझ्या कोसळाने वेड्या, मनी दाटलाय पूर
बरसले शब्द जणू, चिंब भिजला गं सूर..
- प्राजु
2 प्रतिसाद:
ओलावली काया सारी, ओलावले माझे भान
पदरात आज माझ्या, ओल्या सरींचेच दान
सुरेख !
सगळच खूप सुंदर आणि वाचनीय आहे !
ब्लोग चे नाव खूप चं आहे..
टिप्पणी पोस्ट करा