मन हे पाऊस भरले गं
मन हे पाऊस भरले गं
ओलेत्याने फ़िरले गं
क्षणांत येथे क्षणांत तेथे
पागोळ्यातून झरले गं
झर झर झरती धारा गं
आळवावरती पारा गं
नटून थोडा थटून थोडा
जणू लखलख तारा गं
पायी बांधून पैंजण गं
पाऊस करतो नर्तन गं
कधी तृणांवर, कधी फ़ुलावर
झिम्मड ओले शिंपण गं!
अस्वस्थांची गडगड गं
उरांत होते धडधड गं
क्षितिज भंगले, नेत्र गुंगले
वीज बिथरली कडकड गं
सलज्ज हिरवी सळसळ गं
लाघव ओली भोवळ गं
चिंब नाचरे थेंब साचले
जळात भरली ओंजळ गं
ओठी पाऊस गाणे गं
शृंगाराला बहाणे गं
धुंद नाहली नदी वाहली
अंबर होई दिवाणे गं
- प्राजु
1 प्रतिसाद:
सलज्ज हिरवी सळसळ गं
लाघव ओली भोवळ गं
चिंब नाचरे थेंब साचले
जळात भरली ओंजळ गं
खूप सुंदर !
टिप्पणी पोस्ट करा