अबोल प्रीत, उमलतेय पाकळी हळू हळू..
अबोल प्रीत, उमलतेय पाकळी हळू हळू
कि नेत्र सांगती कथाच आपुली हळू हळू??
हृदय भरून वाहती, तुझेच स्पंद अंतरी
भरेल का मनातली हि पोकळी हळू हळू??
सुरेल मारवा तुझाच भारला इथे तिथे
तुझाच पूरिया घुमेल राऊळी हळू हळू
तनूवरी शहारला जसा तुझाच स्पर्श रे
उधाणले उरांत श्वास वादळी हळू हळू
तुझाच गंध घेउनी, खुलेल कंप लाजरा
भिजेल देह कस्तुरीत ...मखमली हळू हळू
कधी सरीत अन कधी तुझ्या उन्हांत नाहते
पहा तुझीच घेरतेय सावली हळू हळू..!!
- प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा