बुधवार, १८ मे, २०११

.. जरा जरा

नभात चांद हासला, लाजला जरा जरा
उरात खोलसा ठसा, उमटला जरा जरा

निशा हसून बोलवी, खोलशा कुशीमध्ये
तुझाच स्पर्श कापरा, अठवला जरा जरा

रवी थकून चालला, काजळी चढे अशी
मनात कालवा उगा जाहला जरा जरा

उगाच एकलेपणा भांडतो उभ्या उभ्या
अखेर सोबतीस तो, थांबला जरा जरा

क्षणांत सांडल्या कशा, पाकळ्या वहीतल्या
नि श्वास आगतीकसा, कोंडला जरा जरा

कितीक चांदण्या जशा, सांडल्या दिठीतुनी
अबोल चांदवा तसा, पुसटला जरा जरा

जमेल 'प्राजु' का तुला, रंगणे असे पुन्हा?
विसावला कसा तुझा कुंचला जरा जरा?
-प्राजु

2 प्रतिसाद:

Unique Poet ! म्हणाले...

सुंदर.... खुप आवडली....!
शुभेच्छा..! :)

Ganesh Bhute म्हणाले...

क्षणांत सांडल्या कशा, पाकळ्या वहीतल्या
नि श्वास आगतीकसा, कोंडला जरा जरा

खूप खूप सुंदर !

Page copy protected against web site content infringement by Copyscape