झाला कोसळ कोसळ..
झाला कोसळ कोसळ, थेंब थेंब आडवला
गुंता कोरड्या रेषांचा, हळूवार सोडवला
झाला कोसळ कोसळ, झाली माती मऊ साय
झाला पसारा तळ्यांचा, झाले लाल तळपाय
झाला कोसळ कोसळ, कोणा राहिले ना भान
तरारले माळ रान, थरारले पान पान
झाला कोसळ कोसळ, झिरपले आत पाणी,
रणरण रान आता, गाते झुळझुळ गाणी
झाला कोसळ कोसळ, माय भिजली भिजली
सुखावून आभाळाच्या, कशी कुशीत निजली!
झाला कोसळ कोसळ, नदी घरात शिरली
चार भिंतीत खेळून, पुन्हा माघारी फ़िरली
झाला कोसळ कोसळ, राहिले ना काही मागे
ओलावल्या भुईवर, सारे घर-दार जागे
झाला कोसळ कोसळ, पूर डोळ्यात दाटला
दैना पाहुनिया, देवा!!! ऊर तुझा का फ़ाटला?
- प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा