दु:ख युगांचे असे बहरले
क्रांतीच्या एका कवितेवरून प्रेरणा घेऊन..
दु:ख युगांचे असे बहरले
उरी न बोचे काही
दिवसानंतर काळोखाची
सवय जडूनी राही
मावळताना सूर्याच्याही
मनात हूरहूर व्हावी
क्षितिजावरची तिमिर रेखा
क्षणात धूसर व्हावी
तळात मातीच्या जरासे
श्वास ओले होती
सूर मारवा पानामधूनी
गीत गाऊनी जाती
सांज कापरी अवनीवरती
थरथर होऊन आली
मूक वेदना ओठावरती
हळूच देऊन गेली
तुकडे तुकडे चंद्राचे त्या
मेघ करती गोळा
फ़ुलल्यानंतर तरूतळाशी
केवळ पाचोळा
एक विराणी पुरीया छेडी
तरंग जळाशयीचे
ऋतू साजरे करती अश्रू
कोणाच्या सयीचे
- प्राजु
1 प्रतिसाद:
एक विराणी पुरीया छेडी
तरंग जळाशयीचे
ऋतू साजरे करती अश्रू
कोणाच्या सयीचे
...खूप सुंदर !
टिप्पणी पोस्ट करा