गुरुवार, २१ एप्रिल, २०११

...झाली गझल निळीशी

घननीळ गीत माझे, मी धून सावळीशी
अन छंद बांधले मी, 'त्या'च्याच चाहुलीशी

मन सैरभैर झाले, येताच सूर दुरुनी
पाव्यात गुंतलेली, मी राधिका खुळीशी

मल्हार छेडलेला, माझ्या कणाकणांनी
अन मोरपीस लावी, मज आस वेगळीशी

निळसर तुझेच लाघव, डोळ्यांत साठवूनी
उधळेन रे मुरारी, मी प्रीत आंधळीशी

गात्रात माझिया रे, भिनले तुझेच वारे
मी एकरूप झाले, तुझियाच सावलीशी

सार्‍याच गोपिकांचा, तू रे सखा, मुकुंदा!
तुझियाविना जगी या भासेल पोकळीशी

'प्राजू' तुला सुद्धा का, गं वेड माधवाचे
शब्दांत 'त्या'स रचुनी, झाली गझल निळीशी

- प्राजु

2 प्रतिसाद:

Vishwesh म्हणाले...

faarach sundar. Mala hi gazal vishesh aavadali ... Kanha chya babatit mi rangabhedi aahe mhanun kadachit :)

Ganesh Bhute म्हणाले...

मल्हार छेडलेला, माझ्या कणाकणांनी
अन मोरपीस लावी, मज आस वेगळीशी

--- खूप सुंदर !

Page copy protected against web site content infringement by Copyscape